कराड उत्तरातील शिवडे येथे सर्व्हिस रोडवरील वाहतुकीमुळे अपघातांचा धोका; शिवसेनेचा रस्ता रोकोचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड /उंब्रज प्रतिनिधी :-
कराड उत्तर तालुक्यातील शिवडे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील मांड नदी पुलाच्या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सध्या सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कराड उत्तर तालुका प्रमुख संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन दिले आहे. शिवडे, भवानवाडी, हनुमानवाडी तसेच मसूर परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि स्थानिक नागरिकांना सर्व्हिस रोडवरून रस्ता ओलांडताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्व्हिस रोडवरील चढ-उतार आणि व्यवस्थित नसलेले गतीरोधक यामुळे वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
हायवे प्रशासनाने पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शिवडे फाटा येथील बोगद्याजवळ वाहतूक नियंत्रणासाठी दररोज किमान चार कर्मचारी तसेच शनिवार-रविवारी वाहतूक वाढत असल्याने सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सर्व घटकांना सोबत घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

