म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरींच्या शाही विवाह सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि माणदेशाचे आराध्य दैवत असलेल्या म्हसवडच्या श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचे वेध आता भाविकांना लागले आहेत. दीपावली पाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ होणार असून, पुढील महिनाभर म्हसवड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता मंदिरातील मुख्य गाभाऱ्याबाहेरील गरुड खांबाशेजारी श्री म्हातारदेव यांच्या मूर्तिसमोर मंदिराचे सालकरी सोमनाथ गुरव यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना व आरती करण्यात येणार आहे. मानकरी, पुजारी आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याचा शुभारंभ होईल.
यानंतर सकाळी ११ वाजता मंदिराच्या हत्ती मंडपात श्रींच्या उत्सवमूर्तींना हळद लावण्याचा पारंपरिक विधी पार पडणार आहे. सालकरी-सालकरीणबाई, परटीण, कुरवली, सुवासिनी महिला, पाळेकरी, पुजारी, गुरव, घडशी व डवरी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न होईल. या हळदीच्या मंगलमय विधीला महिला भाविकांची विशेष उपस्थिती लाभते.
बारा दिवस नगरप्रदक्षिणा; दिवाळी मैदानाचा पारंपरिक उत्साह!
हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर सालकरी, पुजारी आणि उपवास करणारे नवरात्रकरी भाविक नगरप्रदक्षिणेला सुरुवात करतील. सलग बारा दिवस चालणाऱ्या या धार्मिक उपक्रमात दरवर्षी पाचशेहून अधिक भाविक सहभागी होतात.
बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक ‘दिवाळी मैदान’ कार्यक्रम रंगणार आहे. राजबागेतील श्री म्हातारदेव मंदिरात सालकरी व मानकरी यांच्या भेटीनंतर मिरवणुकीने दिवाळी मैदानाकडे प्रस्थान होईल. फटाक्यांची आकर्षक आतषबाजी, भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत आणि पारंपरिक उत्साह यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे.
२१ नोव्हेंबरला शाही विवाहाचा मंगलसोहळा!
शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाहाच्या पवित्र दिवशी रात्री १२ वाजता श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांचा शाही मंगल विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून, विविध धार्मिक विधींनी मंदिर परिसर भक्तिमय होणार आहे.
त्यानंतर मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी काळभैरव अष्टमी साजरी करण्यात येईल. तर बुधवार, दि. ९ डिसेंबर रोजी देवदिवाळीच्या शुभदिनी श्रींच्या उत्सवमूर्तींची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
देवदिवाळीची रथयात्रा (रिंगावन यात्रा )ठरणार सोहळ्याचे मुख्य आकर्षण!
श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या विवाहानंतर निघणाऱ्या वरातीचे प्रतीक मानली जाणारी पारंपरिक रथयात्रा हा संपूर्ण सोहळ्याचा कळसाध्याय ठरणार आहे. बुधवार ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या या रथयात्रेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतून दरवर्षी सुमारे पाच ते सहा लाख भाविक म्हसवड नगरीत दाखल होतात.
श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि लोकसंस्कृतीचा अनोखा संगम असलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे म्हसवडच्या धार्मिक वैभवाची ओळख आहे. दीपावली पाडव्यापासून सुरू होणाऱ्या या मंगलमय पर्वामुळे संपूर्ण म्हसवड नगरीत भक्तीचा जागर होणार असून, ‘श्री सिद्धनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमणार आहे.

