म्हसवडकरांनो, पाणी जपून वापरा! पाच दिवसांतून केवळ एक तासच पाणीपुरवठा; पाण्याचा अपव्यय केल्यास ५ हजारांचा दंड
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी :
यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने म्हसवड शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शहरातील नागरिकांना आता दर पाच दिवसांतून केवळ एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा घटला आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून होणाऱ्या नळ पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणी बचतीसाठी प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना
नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठी करावा. नळांना तोट्या बसवून पाणी भरल्यानंतर त्या त्वरित बंद कराव्यात. नळजोडणीतील गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. शौचालयात अथवा घराबाहेरील मोकळ्या जागेत पाणी विनाकारण सोडू नये. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, रस्ते धुणे, बांधकाम किंवा अन्य अनावश्यक कामांसाठी करू नये. पाणीपुरवठा सुरू असताना नळ उघडे राहून पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.
तसेच पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नगरपरिषद प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याचा अपव्यय केल्यास थेट ५ हजारांचा दंड!
विशेष म्हणजे, म्हसवड नगरपरिषद हद्दीत कोणत्याही नागरिकाकडून पाण्याचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे किंवा पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून, तब्बल ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल; पाणी बचत ही प्रत्येकाची जबाबदारी!‘
पाण्याची बचत ही केवळ नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे. आज केलेली पाण्याची बचत उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
‘चला, पाणी वाचवूया, म्हसवड शहराला पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया!’ असे आवाहन म्हसवड नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

