लोहार समाजाच्या ३२ मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

मुंबई :प्रतिनिधी 

लोहार समाजाच्या ३२ प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे. लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सहा सदस्यीय शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी समितीचे ३२ मागण्यांचे निवेदन बारकाईने पाहून समाजाच्या १२ ते १४ प्रमुख मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले. यासंदर्भात एक-दोन दिवसांत अधिकृत लेखी पत्र देण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.

लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करणे, महामंडळाच्या निधीत वाढ करणे तसेच प्रतिनिधी नियुक्तीबाबत निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे तसेच जामनेर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण चंदनपाट यांच्या सहकार्याने ही बैठक झाल्याचे समितीने नमूद केले. बैठकीदरम्यान शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीस दिलीप रामचंद्र वसव (पुणे), ॲड. युवराज मुरार जाधव (कल्याण), ललित वासुदेव सपकाळे (जामनेर), श्रीकृष्ण सुपडू चंदनपाट (जामनेर), अंकुश बबन थोरात (सोलापूर) आणि विनायक भगवान हरळ (धुळे) उपस्थित होते.

समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडून होणाऱ्या अधिकृत निर्णयाकडे आता लोहार समाजाचे लक्ष लागले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *