धावत्या खासगी बसमध्ये महिलेचा विनयभंग; खांडवीजवळील घटना, बार्शी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी :प्रतिनिधी
किल्लारी येथून पुण्यातील भोसरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास खांडवी (ता. बार्शी, जि. सोलापूर) गावाजवळ घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात शुभम पॉल नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २८ सप्टेंबर रोजी अनुष्का ट्रॅव्हल्सच्या MH 11 CH 7752 क्रमांकाच्या बसमधून किल्लारी ते भोसरी असा प्रवास करीत होती. बस खांडवी गावाजवळ आली असता, महिलेच्या सीटच्या मागील सीटवर बसलेल्या शुभम पॉल याने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे.
या प्रकारानंतर महिलेने आरडाओरडा करून बसचे कंडक्टर प्रतीक पोटे, चालक लक्ष्मण कांबळे आणि बसमालक अमोल डोंगरे यांना घटनेची माहिती दिली. मात्र, संबंधित व्यक्तीने आरोपीला जवळच्या पोलीस ठाण्यात न नेता पळून जाण्याची संधी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ आणि ७५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निचळ हे करीत आहेत.

