धार्मिक परंपरेला सामाजिक कार्याची जोड; भैरवनाथ मंदिरातील अन्नदानाचा १५ हजारांचा खर्च दुष्काळ निवारणासाठी!
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज (प्रतिनिधी) :
धार्मिक श्रद्धा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणाऱ्या उंब्रज येथील जाधव कुटुंबीयांनी एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे. प्रबोधिनी भागवत एकादशीनिमित्त दि. २१ नोव्हेंबर रोजी भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्नदान कार्यक्रमाचा खर्च टाळून, त्यासाठी राखून ठेवलेली १५ हजार रुपयांची रक्कम दुष्काळ निवारणासाठी देण्याचा निर्णय गणेश जाधव, सचिन जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. या सामाजिक उपक्रमासाठीचा १५ हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
धार्मिक कार्यक्रमांवरील खर्चाला सामाजिक कार्याची जोड देत जाधव कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सण-उत्सव आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करताना समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे. यावेळी सचिन जाधव, अतुल पाटील, रणजित पाटील (नाना), विजय माळी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
जाधव कुटुंबीय केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांतही सातत्याने योगदान देत आले आहेत. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी एहसास मतिमंद मुलांची शाळा, वळसे-शेंद्रे येथे आर्थिक मदत केली होती. तसेच उंब्रज ग्रामपंचायतीमधील आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, रेनकोट आणि बूट यांचे वाटप करून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली होती.
इतकेच नव्हे, तर आपल्या मुलांचे वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून काळेवाडी (ता. कराड) येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांना देणगी देत साजरे करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे.
धार्मिक श्रद्धा, सामाजिक जाणीव आणि गरजूंच्या मदतीची तळमळ यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या जाधव कुटुंबीयांनी आपल्या कृतीतून समाजासमोर सेवाभावाचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उंब्रज परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

