सात वर्षांनंतरही शहीद जवान दीपक घाडगे यांचे स्मारक अपूर्णच!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
सातारा :प्रतिनिधी 

देशाच्या सीमेचे रक्षण करताना मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान दीपक घाडगे यांच्या स्मारकाची सात वर्षांनंतरही दुरवस्था कायम असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ९ मार्च २०१७ रोजी भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सातारा तालुक्यातील फत्त्यापूर गावच्या या वीरपुत्राचे स्मारक अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मारकावर स्मृतिचिन्हही उभारण्यात आले नसल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला शहीद जवानाच्या स्मृतींचा विसर पडला आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम आणि सातारा तालुकाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी फत्त्यापूर गावाला भेट देत माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विविध अडचणी जाणून घेऊन शासनाच्या सैनिक कल्याणकारी योजना आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या भेटीदरम्यान शहीद दीपक घाडगे यांच्या स्मारकाची पाहणी केली असता, अनेक वर्षांनंतरही स्मारकाचे काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानाच्या स्मारकाला अद्याप स्मृतिचिन्हही बसविण्यात आले नसल्याने माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्याची जबाबदारी शासन आणि समाजाची असताना स्मारकाचे काम रखडणे ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.

शहीद जवानांच्या स्मृती जपणे ही केवळ औपचारिकता नको!

सातारा जिल्ह्याला शूरवीरांची मोठी परंपरा लाभली आहे. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या त्यागाचा सन्मान केवळ भाषणांपुरता किंवा राष्ट्रीय सणांपुरता मर्यादित राहता कामा नये. त्यामुळे सातारा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, राज्याचे मंत्री तसेच सैनिक कल्याण विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून शहीद दीपक घाडगे यांच्या स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करावे आणि स्मृतिचिन्ह उभारावे, अशी ठाम मागणी सैनिक फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

शहीद जवान कुटुंबीयांच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात

दरम्यान, सैनिक, माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनने ‘शहीद जवान कुटुंबीयांच्या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात फत्त्यापूर येथे शहीद दीपक घाडगे यांच्या स्मृतींना अभिवादन करून करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भेटी देऊन आजी-माजी सैनिक संघटना आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. संबंधित प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या माजी सैनिक विशेष जनता दरबारातही हे प्रश्न मांडण्यात येणार आहेत.

माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा शहीद दिनापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या त्यागाची जाणीव समाजाने कायम ठेवली पाहिजे, अशी भूमिका फेडरेशनने मांडली.

यावेळी माजी सरपंच शंकर घाडगे, अजित घाडगे, सुभाष घाडगे, रामचंद्र घाडगे, प्रकाश घाडगे, ज्ञानदेव घाडगे, उत्तम कुरे, गुलाब कवडे, विनायक घाडगे, तुकाराम घाडगे, हिंदुराव कदम यांच्यासह गावातील माजी सैनिक उपस्थित होते.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *