म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथांचे १२ दिवसांचे अतिशय कडक ‘उभे नवरात्र’ सुरू; भाविकांकडून कठोर व्रताचे पालन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड  : प्रतिनिधी 

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हसवड नगरीचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याला सध्या धार्मिक उत्साहात सुरुवात झाली आहे. दीपावली पाडव्यापासून सुरू झालेल्या या विवाह सोहळ्यातील एक महत्त्वाची आणि अत्यंत कठीण धार्मिक परंपरा असलेले श्री सिद्धनाथांचे १२ दिवसांचे ‘उभे नवरात्र’ मंदिरात सुरू झाले असून, भाविकांकडून या कठोर व्रताचे श्रद्धेने पालन केले जात आहे.

म्हसवड येथील माणगंगा नदीच्या तीरावर दहाव्या शतकातील प्राचीन हेमाडपंथी श्री सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिरात अनेक शतकांपासून विविध धार्मिक विधी, उपासना आणि व्रतपरंपरा अखंडपणे सुरू आहेत. त्यापैकी ‘उभे नवरात्र’ ही अत्यंत कठीण आणि शारीरिक संयमाची कसोटी पाहणारी उपासना म्हणून ओळखली जाते.

श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा परंपरेनुसार तब्बल एक महिना साजरा केला जातो. हळद, विवाह आणि वरात अशा पारंपरिक विधींनी या सोहळ्याची सांगता होते. या विवाह सोहळ्यातील दीपावली पाडव्यापासून तुळशी विवाहापर्यंतचे बारा दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. पाडव्याच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी व सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. तेव्हापासून बारा दिवसांच्या नवरात्र व्रताला सुरुवात होते.

पहाटे चार वाजता कार्तिकस्नान अन् नगरप्रदक्षिणा

उभे नवरात्र करणाऱ्या भाविकांना दररोज पहाटे चार वाजता कार्तिकस्नान करून नगरप्रदक्षिणा घालावी लागते. श्री सिद्धनाथ मंदिरापासून सुरू होणारी ही प्रदक्षिणा महादेव मंदिर (कोट), माणगंगा नदीपात्र, बाजारपटांगण, विठ्ठल मंदिर, जोतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, सिद्धनाथ हायस्कूल, संत गाडगेबाबा समाधी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, वडजाई ओढा, लक्ष्मी-मरीआई मंदिर, रथगृह, मारुती-शनी मंदिर आणि श्रीनाथ मठ अशा विविध धार्मिक स्थळांना भेट देत पुन्हा सिद्धनाथ मंदिरात येऊन पूर्ण होते.

या प्रदक्षिणेदरम्यान भाविक श्रींचा नामजप करतात तसेच सिद्धनाथांचा महिमा सांगणारी भक्तिगीते गातात. बारा दिवसांत येणाऱ्या रविवारी म्हसवडपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील राजाच्या बागेतील म्हातारदेव मंदिर आणि परतीच्या प्रवासात वडजाई मंदिर येथेही प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे.

१२ दिवस पाय जमिनीवर ठेवूनच उपासना!

उभे नवरात्र करणाऱ्या भाविकांसाठी कठोर नियमांचे पालन करणे आवश्यक असते. या व्रतात पुरुषांचाच सहभाग असतो. व्रतधारक धोतर परिधान करून खांद्यावर उपरणे घेतात आणि हातात शुद्ध पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घेऊन अनवाणी पायांनी नगरप्रदक्षिणा करतात. बारा दिवस एकच पेहराव ठेवण्याचीही परंपरा आहे.

या काळात पायात चप्पल घालणे, गावाची वेस ओलांडून बाहेरगावी जाणे किंवा नगरप्रदक्षिणेत खंड पडू देणे निषिद्ध मानले जाते. सर्वांत कठीण नियम म्हणजे व्रतधारकाने बारा दिवस उभे राहूनच उपासना करायची असते. बसताना किंवा विश्रांती घेतानाही किमान एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो. झोपतानाही दोन्ही पाय जमिनीपासून वर घेता येत नाहीत. जमिनीवर मांडी घालून बसण्यासही मनाई असते.

या संपूर्ण काळात श्रींचा अखंड नामजप, शुद्ध आचार-विचार आणि पावित्र्य राखून व्रताचे पालन केले जाते. पाडव्याच्या दिवशी पहाटे जाग आल्यापासूनच व्रतधारक उभे राहतात आणि पुढील बारा दिवस ही कठोर उपासना सुरू ठेवतात.

तुळशी विवाहादिवशी व्रताची सांगता

शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील घट उठविले जातात. त्यानंतर बारा दिवसांच्या नवरात्र व्रताची सांगता होऊन भाविकांचे उपवास सुटतात. याच दिवशी रात्री बारा वाजता श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपरिक धार्मिक विधींनी मोठ्या थाटामाटात संपन्न होतो.

अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही कठोर धार्मिक परंपरा येथील पुजारी, सालकरी आणि भाविकांनी आजही तितक्याच श्रद्धेने जपली आहे. विशेष म्हणजे, या व्रतामध्ये आजपर्यंत महिलांचा सहभाग नसल्याची परंपरा सांगितली जाते. काळानुसार या व्रताचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असून, उभे नवरात्र करणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. श्रद्धा, संयम आणि भक्तीचा अनोखा संगम असलेली ही परंपरा म्हसवडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मानाचे स्थान राखून आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *