आईच्या कुशीत पुन्हा विसावला हरवलेला चिमुकला; बार्शी तालुका पोलिसांची माणुसकीपूर्ण कामगिरी!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी :प्रतिनिधी
रस्त्यावर एकटा रडत फिरणारा चिमुकला… आपल्या काळजाच्या तुकड्याचा शोध घेत व्याकूळ झालेली आई… अशा भावनिक प्रसंगात बार्शी तालुका पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी यामुळे हरवलेल्या चिमुकल्याची आईशी सुखरूप भेट घडून आली. पोलिसांच्या या संवेदनशील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बार्शी शहरात एक लहान मूल रस्त्यावर एकटेच रडत फिरत असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी त्या चिमुकल्याला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्वतः पुढाकार घेत मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला. मुलाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विचार न करता विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे अवघ्या काही वेळातच मुलाच्या आईचा शोध लागला.

सदर चिमुकल्याचे नाव आर्यन अबदेश वर्मा असून त्याच्या आईचे नाव ज्योती आहे. त्या बार्शी येथील फुले मंगल कार्यालयासमोर सादिक वस्ताद यांच्या येथे भाड्याने राहतात.

अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि आई-मुलाची भेट घडून आली. आपला चिमुकला सुखरूप समोर पाहताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही वेळापूर्वी हरवलेल्या मुलाच्या शोधात असलेल्या आईला पुन्हा आपल्या लेकराला कुशीत घेता आले. या क्षणी उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

या कौतुकास्पद कामगिरीत ठाणे अंमलदार अरुण डुकळे व शंकर खराडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच श्रीकांत वायचळ, अभिजीत शिंदे आणि सादिक शेख यांनीही मोलाचे सहकार्य केले.

कायद्याचे रक्षण करतानाच माणुसकीचे नाते जपणाऱ्या बार्शी तालुका पोलिसांनी या कृतीतून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पोलिसांच्या या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *