निवडणुकीतील पैशांचा खेळ लोकशाहीसाठी घातक! मतदारांच्या विवेकबुद्धीला आर्थिक आमिषांचे ग्रहण
व्हिजन २४ तास न्यूज
श्रीरंग काटेकर,
सातारा :प्रतिनिधी
लोकशाहीचा खरा आधार असलेले मतदान आज पैशांच्या आमिषांमुळे आणि निवडणुकीतील सौदेबाजीमुळे धोक्यात येत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. मतदारांचा विश्वास संपादन करण्याऐवजी त्यांना आर्थिक प्रलोभने दाखवून मते मिळविण्याची प्रवृत्ती वाढत असून, हा प्रकार भारतीय लोकशाहीच्या नैतिक मूल्यांना तडा देणारा ठरत आहे. निवडणुकीतील या बदलत्या प्रवृत्तीवर श्रीरंग काटेकर यांनी परखड भाष्य केले आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून साकारलेल्या लोकशाही व्यवस्थेत मतदान हा केवळ अधिकार नसून देशाचे भविष्य घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत निवडणुकांचे स्वरूप बदलताना दिसत आहे. विकासकामे, जनहिताचे प्रश्न, उमेदवाराची कार्यक्षमता आणि चारित्र्य यापेक्षा आर्थिक आमिषांना अधिक महत्त्व मिळू लागल्याची खंत व्यक्त होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्येही मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविल्याच्या चर्चा रंगल्या. उमेदवारांकडून कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याचे आरोप आणि चर्चांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मतदान मिळविण्यासाठी पैशांचा वापर करण्याची स्पर्धा निर्माण होत असेल, तर सामान्य आणि प्रामाणिक उमेदवारांसाठी लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया अधिक कठीण बनणार आहे.
विशेष म्हणजे, पैशांच्या आमिषाचे हे लोण आता केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांपर्यंत ही प्रवृत्ती पोहोचत असल्याचे चित्र आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्येही निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांच्या चर्चा होत असल्याने लोकशाहीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मतदारांनीही आपल्या एका मताची किंमत पैशांमध्ये न मोजता उमेदवाराचे काम, विचार, प्रामाणिकपणा आणि भविष्यातील विकासाची भूमिका लक्षात घेऊन मतदान करणे आवश्यक आहे. कारण आज घेतलेले आर्थिक आमिष उद्याच्या पाच वर्षांच्या विकासावर परिणाम करू शकते. पैशांच्या जोरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून जनहितापेक्षा स्वतःचे राजकीय हित जपले जाण्याचा धोका नाकारता येत नाही.
लोकशाही बळकट करण्यासाठी शासन, निवडणूक यंत्रणा, राजकीय पक्ष आणि मतदार या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती केली जाते; मात्र मतदान निर्भीड, निष्पक्ष आणि पैशांच्या प्रभावापासून मुक्त राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या विवेकबुद्धीने मतदान केले, तरच लोकशाहीची खरी प्रतिष्ठा टिकून राहील.
मतदान हा विक्रीचा व्यवहार नसून लोकशाहीचा पवित्र अधिकार आहे. मतांची खरेदी-विक्री थांबली नाही, तर लोकशाहीचा आत्माच धोक्यात येईल. त्यामुळे निवडणुकीतील पैशांच्या सौदेबाजीविरोधात समाजाने जागरूक होण्याची वेळ आली आहे.- श्रीरंग काटेकर,

