म्हसवड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम! ग्रामसुरक्षा दलाला साहित्य वाटप; ‘गणराया अवॉर्ड २०२६’मध्ये उत्कृष्ट मंडळांचा गौरव!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

ग्रामसुरक्षा दलाचे मनोबल वाढविण्यासह शांततेत आणि सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हसवड पोलिसांनी राबविला. ग्रामसुरक्षा दलातील २०० तरुणांना टी-शर्ट, लाठी, बॅटरी व शिट्टीचे वाटप करण्यात आले, तर ‘गणराया अवॉर्ड २०२६’ अंतर्गत उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात आयोजित या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सुनील जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी प्रास्ताविक केले.

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० गावांमधील ग्रामसुरक्षा दलांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. गावातील शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.

‘गणराया अवॉर्ड २०२६’ स्पर्धेत १९० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक नवतरुण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, विरळी; द्वितीय क्रमांक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गणेश उत्सव मंडळ, गटेवाडी; तर तृतीय क्रमांक बिरूदेव गणेश मंडळ, कारंडेवाडी (कुकुडवाड) यांनी पटकावला.

शहरी विभागात प्रथम क्रमांक सहकार गणेश उत्सव मंडळ, द्वितीय क्रमांक वैभव गणेश मंडळ आणि तृतीय क्रमांक नवज्योत गणेश उत्सव मंडळ, म्हसवड यांनी मिळविला. सर्व विजेत्या मंडळांचा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जांभुळणीचे पोलीस पाटील सुभाष तुळशीराम काळेल यांना उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पुकळेवाडीच्या पोलीस पाटील सौ. लता हेमंत पुकळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

पोलीस आणि नागरिकांमधील समन्वय वाढविणे, सामाजिक एकता जपणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.

म्हसवड पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *