माणच्या मातीतील सन्मानाने सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली ; नगरसेविका आकांक्षा विरकर भावुक
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी :
माणदेशाच्या मातीशी असलेले नाते, आपल्या माणसांचे प्रेम आणि समाजाने दिलेला सन्मान हीच सार्वजनिक जीवनातील खरी ताकद असल्याची भावना व्यक्त करत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. आकांक्षा शंकरभाई विरकर या सत्कार समारंभात भावुक झाल्या. अहिंसा पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांच्या शुभहस्ते हा सत्कार पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आकांक्षा विरकर यांचे स्वागत केले.

सत्कारास उत्तर देताना आकांक्षा विरकर म्हणाल्या, “मी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात नगरसेविका म्हणून कार्य करत असले तरी माझी मुळे ही माणदेशाच्या मातीतच रुजलेली आहेत. आज आपल्या माणसांनी एवढ्या प्रेमाने आणि आत्मीयतेने माझा सन्मान केला, यामुळे मी भारावून गेले आहे. हा सन्मान मला पुढील सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी निश्चितच प्रेरणा व ऊर्जा देणारा ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या की, मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नरेंद्रभाई मेहता यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि नागरिकांनी विश्वास टाकत नगरसेविका म्हणून निवडून दिले. ही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा माण-खटाव मतदारसंघाचे नेते ना. जयकुमार गोरे यांनी मीरा भाईंदर येथील एका कार्यक्रमात शुभेच्छा देत आनंद व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. “माणदेशातील लोकांचा आशीर्वाद आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन हेच माझ्या कार्याची प्रेरणा आहे,” असेही त्या म्हणाल्या.
मीरा भाईंदर परिसरात कार्यरत असतानाही नागोबा फाउंडेशनच्या माध्यमातून माणदेशातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये आपण आणि आपले वडील शंकरभाई विरकर सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत, सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक मदत तसेच गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यावर फाउंडेशनचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक व उत्साही वातावरणात करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिरापासून वाजतगाजत मिरवणूक काढून नगरसेविका आकांक्षा विरकर व उपस्थित मान्यवरांना अहिंसा पतसंस्थेच्या कार्यालयात आणण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झालेल्या स्वागतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
समारंभात ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर, लुनेश विरकर सर, नितिनभाई दोशी तसेच नागोबा फाउंडेशनचे अध्यक्ष शंकरभाई विरकर यांनी आपल्या मनोगतातून आकांक्षा विरकर यांच्या कार्याचा गौरव केला. तरुण पिढीने समाजकारण आणि लोकसेवेत पुढे यावे, यासाठी आकांक्षा विरकर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास मीरा भाईंदर भाजपचे उपाध्यक्ष शंकरभाई विरकर, कु. अपेक्षा विरकर, लुनेश विरकर सर, ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे, श्रावण पडळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिंसा पतसंस्थेचे लिपिक अक्षय धट यांनी केले. समारंभाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

