दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ म्हसवड कडकडीत बंद; हजारो विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारविरोधात एल्गार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड,  : (प्रतिनिधी )

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधाची धग आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही पोहोचली असून, माण तालुक्यातील म्हसवड शहरात गुरुवारी तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेच्या समर्थनार्थ शहरात भव्य निषेध रॅली काढण्यात आली. या आंदोलनाला व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत निषेध फेरी काढण्यात आली.

“भारत माता की जय”, “इन्कलाब जिंदाबाद”, “पोलिस अत्याचाराचा निषेध असो”, “वी वाँट जस्टिस” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनादरम्यान म्हसवडच्या अपर तहसीलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात आले. दिल्लीतील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. हे निवेदन शासनापर्यंत तातडीने पोहोचवावे, अशी विनंतीही आंदोलकांनी केली.

यावेळी विविध विद्यार्थी प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी शक्तीचा वापर करणे लोकशाहीला घातक असल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर होणे निषेधार्ह असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने मुख्य बाजारपेठ दिवसभर शांत दिसून आली. अनेक दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्याने आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या आंदोलनात किशोर सोनवणे, तेजसिंह राजमाने, आंगुली बनसोडे, संजय पाटील, हनुमंत ढवण, निलेश सस्तपे, महेश करचे, ऋषी जगताप, दिलीप तुपे, आजिनाथ केवटे, राजकुमार डोंबे, स्वयं शिके, बाळासाहेब माने, अशोक काळे, विश्वजीत केंगार, सचिन लोखंडे, परेश व्होरा, संक्यम जगताप, विनय जगताप, सतीश जगताप, राहुल कोथळे, साहेबराव वगरे, विकास जगताप, चैतन्य काळे, गौरव देवकुळे यांच्यासह विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *