गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

दहिवडी :प्रतिनिधी 

गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दहिवडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. विविध गुन्हे दाखल असलेल्या तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची शक्यता असलेल्या ५५ इसमांना माण तालुक्यात प्रवेश करण्यास तीन दिवसांची मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारू विक्री, अवैध धंदे, गर्दी व मारामारी यांसारख्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या ५५ इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, माण-खटाव (दहिवडी) यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावावर कार्यवाही करत उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित ५५ इसमांविरुद्ध मनाई आदेश जारी केले. त्यानुसार २३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या तीन दिवसांच्या कालावधीत संबंधित इसमांना माण तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची संबंधितांना बजावणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून शासनाने निर्धारित केलेल्या नियम व अटींचे पालन व्हावे, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये सुमारे १ हजार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दहिवडी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब गोसावी व महिला पोलीस नाईक पूनम राजपूत यांनी केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *