राँग साईडने आलेल्या दुचाकीची धडक; मनकर्णवाडीतील युवकाचा मृत्यू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड,(प्रतिनिधी )  दि. २४ :

माण तालुक्यातील पळशी गावच्या हद्दीत मनकर्णवाडी–पळशी मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मनकर्णवाडी येथील रमेश किसन गेंड (वय ४२) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गेंड हे शासकीय मतदार गणना (SIR) कार्यक्रमाच्या कामासाठी त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ११ एटी ३५२८) या दुचाकीवरून जात होते. पळशी गावाजवळील माळवेवस्ती परिसरात समोरून येणाऱ्या हिरो पॅशन प्लस (एमएच ५३ डी १४९७) या दुचाकीचा चालक पांडुरंग लालासो करडे (रा. पळशी, ता. माण) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत राँग साईडने येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश गेंड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथे नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी मयताचे बंधू निलेश किसन गेंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदिप पोमन यांचे मार्गदर्शनाखाली    पोलीस हवालदार डी. पी. खाडे करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *