ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी तळबीड पोलिसांची पुढाकार; शिरवडेत जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते | कराड
शिरवडे (ता. कराड):
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, सन्मान आणि कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने शिरवडे येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) रवींद्र भोरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना सायबर फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी किंवा इतर गोपनीय आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास किंवा फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ तळबीड पोलीस ठाणे अथवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात ‘पालक व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण व कल्याण अधिनियम, 2007’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे कायदेशीर हक्क, सन्मानाने जगण्याचा अधिकार, कुटुंबीयांकडून भरणपोषणाचा हक्क तसेच त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. “ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलीस सदैव तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास निर्धास्तपणे पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन API रवींद्र भोरे यांनी केले.
या उपक्रमास शिरवडे गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तळबीड पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत स्वागत केले.

