इंदोली पुलाजवळील गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड, (प्रतिनिधी ):

उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सातारा आणि उंब्रज पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अहिल्यानगर येथून अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

    17 जुलै रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता मौजे पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून संतोष शंकर घोलप (वय 37, रा. कालगाव, ता. कराड) यांना आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण याने फोन करून बोलावले. त्यावेळी त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित याने फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने आपल्या फॉर्च्युनर कारमधून पिस्तूल काढून फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करताना त्या फिर्यादीच्या दोन्ही पायांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

      या घटनेप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 297/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

         तपासादरम्यान आरोपी अहिल्यानगर येथे पळून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर कायनेटिक चौक परिसरातील साई सूर्य हॉटेलमध्ये दोन्ही आरोपी लपून बसल्याची खात्री होताच पोलिसांनी सापळा रचून सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड) आणि योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

        ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *