म्हसवड नगरी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज; प्रथमच उभारला भव्य सुविधा मंडप, नगरपरिषदेची सर्व यंत्रणा २४ तास सेवेत
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी म्हसवड शहर सज्ज झाले असून, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड नगरपरिषदेकडून स्वच्छता, आरोग्य, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आपत्ती व्यवस्थापन अशा सर्व सुविधांची व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर वातावरण मिळावे, यासाठी नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी शहरात विशेष महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि शासकीय कार्यालयांची सखोल स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करून ती वारकऱ्यांच्या वापरासाठी सज्ज करण्यात आली असून, शहरात रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित फॉगिंग तसेच आवश्यक ठिकाणी बीएचसी पावडरची फवारणी सुरू आहे.

शहरातील दोन सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वारकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने नवीन मोबाईल शौचालयांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना स्वच्छ व सुलभ स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावर्षी प्रथमच वारकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य पत्रा मंडप उभारून “मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र” सुरू करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामध्ये निवारा कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, फुट मसाज सुविधा, आरोग्य सेवा, हरवलेल्या वारकऱ्यांसाठी मदत कक्ष, मोबाईल चार्जिंग स्टेशन तसेच स्वच्छ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध झाल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी सतत सेवेत राहून गरजू वारकऱ्यांवर उपचार करणार आहेत.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी म्हसवड आपत्ती व्यवस्थापन कक्षही २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर सुविधा सज्ज ठेवून कोणत्याही संकटाला तत्काळ प्रतिसाद देण्याची तयारी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र सेवेत कार्यरत असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक स्तरावर नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. “स्वच्छ, सुंदर आणि सेवाभावी म्हसवड” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नगरपरिषद आषाढी वारी सुखकर, सुरक्षित आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, पालखी तळाची पाहणी नगराध्यक्षा पूजाताई सचिन विरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी निशांत पिसे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती विजय रामचंद्र बनगर तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली. पाहणीदरम्यान विविध सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
आषाढी वारीच्या निमित्ताने म्हसवड शहरात भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा सुंदर संगम पाहायला मिळत असून, लाखो वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

