म्हसवडमध्ये हजारो मराठा बांधवांचा एल्गार!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, :प्रतिनिधी
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज, माण यांच्या वतीने रविवारी म्हसवड शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील हजारो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण म्हसवड शहरात मराठा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात झाली. मोटारसायकलींच्या लांबच लांब ताफ्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते मराठा बांधवांनी फुलून गेले होते. रॅलीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज दादा, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘महाराष्ट्रचे ३६ जिल्हे, मनोज दादांचे बालेकिल्ले’, ‘मराठा खडा तो सरकार से बड़ा’ अशा घोषणांनी म्हसवड शहर दुमदुमून गेले.
रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे यांच्यासह विविध महापुरुषांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले.
रॅलीनंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाने मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
सरकारला मतदानातून उत्तर देण्याचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने मराठा समाज आपली ताकद दाखवेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात सुमारे ३ लाख ५२ हजार मतदार असून त्यापैकी जवळपास १ लाख ६५ हजार मतदार मराठा समाजाचे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
‘यावेळी मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला, तर आगामी काळात मराठा समाज मतदानाच्या माध्यमातून त्याचे उत्तर देईल,’ असा स्पष्ट संदेशही सरकारला देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे आंदोलन व उपोषण तातडीने सोडवावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या रॅलीत अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या निमित्ताने म्हसवडमध्ये मराठा समाजाची मोठी एकजूट पाहायला मिळाली.

