त्याग आणि निष्ठेचे फळ; काका धुमाळ जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
व्हिजन २४ तास न्यूज
श्रीरंग काटेकर
सातारा.-प्रतिनिधी
कर्तृत्व, त्याग आणि निष्ठेच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याची प्रचिती सोमनाथ उर्फ काका धुमाळ यांच्या प्रवासातून येते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मुख्य स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळणारे काका धुमाळ आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रवासाची चर्चा सुरू झाली आहे.
सन २०१६ मध्ये उदयनराजे भोसले यांच्या शब्दाचा मान राखत काका धुमाळ यांनी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या निर्णयातून त्यांनी आपली निष्ठा आणि त्यागाची भूमिका अधोरेखित केली. त्यानंतर अनेक वर्षे उदयनराजे भोसले यांच्यासोबत काम करताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची संधी मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले काका धुमाळ यांचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे. कांदे-बटाटे विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जिल्हा बँकेच्या संचालकपदापर्यंत पोहोचला आहे. उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्याची त्यांची पद्धत आणि शांत व संयमी स्वभाव यामुळे ते परिचित आहेत.
उदयनराजे भोसले यांच्या कामकाजातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना काका धुमाळ यांनी अनेक वर्षे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्न केले. गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या अडचणींची जाण असलेल्या काका धुमाळ यांना आता सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था मानली जाते. या बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकार क्षेत्रातील अडचणी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांशी संबंधित विषयांवर ते कशा प्रकारे काम करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
‘जेथे कमी, तेथे काका धुमाळ’ अशी ओळख त्यांच्या कार्यपद्धतीतून निर्माण झाल्याचे समर्थक सांगतात. जलमंदिराशी असलेली त्यांची जवळीक आणि उदयनराजे भोसले यांच्याशी असलेले विश्वासाचे नाते यामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. मात्र, प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्त्व देण्याची त्यांची भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानली जाते.
त्याग, निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्याच्या बळावर काका धुमाळ यांनी आपल्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्या या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, नव्या जबाबदारीतून ते शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षांना कितपत न्याय देतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

