बार्शी तालुक्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ८७.६० टक्के मतदान! सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त; सहा केंद्रांवर मतदान शांततेत
व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी :प्रतिनिधी
शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा मतदान केंद्रांवर शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. या सहाही केंद्रांवर एकूण ९७६ मतदारांपैकी ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी ८७.६० टक्के इतकी नोंदविण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांवर योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पानगाव, आगळगाव आणि सुर्डी येथील सहा मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला होता.
पानगाव येथील संत तुकाराम विद्यालयातील दोन केंद्रांवर अनुक्रमे ९३.२२ टक्के आणि ८५.७८ टक्के मतदान झाले. आगळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन केंद्रांवर अनुक्रमे ९५ टक्के आणि ८६.३६ टक्के मतदानाची नोंद झाली. सुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन केंद्रांवर अनुक्रमे ९४.११ टक्के आणि ८४.३० टक्के मतदान झाले.
या सहा केंद्रांपैकी आगळगाव येथील खोली क्रमांक ०२ या केंद्रावर सर्वाधिक ९५ टक्के मतदान झाले. तर सुर्डी येथील खोली क्रमांक ०१ या केंद्रावर ८४.३० टक्के मतदानाची नोंद झाली.
सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही परिसरात पोलीस पेट्रोलिंग सुरू ठेवण्यात आले आहे.

