म्हसवडमध्ये पाण्याच्या टँकरमध्ये वेल्डिंग करताना युवकाचा मृत्यू; अचानक चक्कर आल्याने बेशुद्ध पडला
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड शहरातील मायणी चौक परिसरात पाण्याच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम करत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ३१ वर्षीय युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव प्रमोद सुभाष साळुंखे (वय ३१) असून तो मूळचा यशवंतनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील रहिवासी होता. सध्या तो म्हसवड येथे वास्तव्यास होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद साळुंखे हे दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मायणी चौकातील जोगेश्वरी वेल्डिंग वर्क्ससमोर पाण्याच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम करीत होते. काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले.
घटनेनंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २४/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. एल. कुंभार करीत आहेत. या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेने साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

