देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कराड तहसील कार्यालयावर मोर्चा
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी
देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले.
देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची इतर हक्कातील नावे मूळ हक्कात घेण्यात यावीत, तसेच त्यांच्या वारसा हक्काच्या नोंदी तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या हक्कांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी किसान सभेने केली.
देवस्थान जमीन कसणारे शेतकरी कुळ अण्णा बाबू तडाखे, वसंत बाबू तडाखे, दिनकर बाबू तडाखे आणि बजरंग तडाखे यांच्या जमिनी पुन्हा देवस्थानाला देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. देवस्थानच्या जमिनी प्रत्यक्षात कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गोंदी गावातील देवस्थान जमीन कसणारे शेतकरी खंड भरण्यासाठी गेले असता त्यांचा खंड स्वीकारण्यात आला नसल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांकडून खंड भरून घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच देवस्थान इनाम व्यवस्था खालसा करून या जमिनी प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी किसान सभेने केली.
अखिल भारतीय किसान सभेचे सातारा जिल्हा अध्यक्ष कॉ. माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात कॉ. उमेश देशमुख, जालिंदर यादव गुरुजी, संग्राम पवार, प्रकाश यादव, माणिक पाटील, अशोक यादव, राजू पवार, नितीन पाटील, राजेंद्र माने, कुमार चिंचकर, अरुण देशमुख, आनंद मुळगावकर, नुरुल मुल्ला यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली.

