पुण्यात राज्यस्तरीय माजी सैनिक मेळावा; सैनिक कल्याण विभागातील रिक्त पदे भरण्याची जोरदार मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

पुणे (शिरूर), दि. 29 (प्रतिनिधी) :

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे महाराष्ट्रातील माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात पार पडला. माजी सैनिक शिखर एकता संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच शिवाजी अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सैनिक कल्याण विभाग, पुणेचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (नि.) होते. यावेळी उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर (नि.) तसेच माजी उपसंचालक लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे (नि.) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्ह्याच्या वतीने माजी सैनिक प्रशांत कदम यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी पदे रिक्त असल्याने माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वारसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. विशेषतः सातारा जिल्ह्यात सुमारे ७० हजार माजी सैनिक, सेवारत सैनिक व पॅरामिलिटरी दलातील जवान असूनही पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सैनिक कल्याण निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून ती तातडीने वितरित करण्याची मागणीही करण्यात आली.

यावर उत्तर देताना कर्नल दीपक ठोंगे यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांच्या भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल तसेच प्रलंबित आर्थिक मदतही लवकर वितरित केली जाईल, असे आश्वासन दिले.

या मेळाव्यास सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, त्रिदल सैनिक संघटना, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, राष्ट्रवादी सैनिक सेल (अजित पवार गट), भारतीय जवान किसान पार्टीसह विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *