सिद्धनाथच्या धावपटूंचा माण तालुक्यात जलवा! मैदान गाजवत अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड (प्रतिनिधी) :
माण तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मैदानावर आपला ठसा उमटवला. माणदेशी चॅम्पियन्स फाऊंडेशन, म्हसवड येथे झालेल्या या स्पर्धेत सिद्धनाथच्या खेळाडूंनी विविध धावण्याच्या व मैदानी क्रीडा प्रकारांत पदकांची कमाई केली. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या अनेक खेळाडूंची आता सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात अनिश सरतापे याने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्यात दुहेरी सुवर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. संतोष विरकर याने ५००० मीटरमध्ये प्रथम तर ३००० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. महेश खांडेकर याने ८०० मीटर धावण्यात अव्वल स्थान पटकावले.
संग्राम खांडेकर याने ४०० मीटर धावणे आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवत अष्टपैलू कामगिरी केली. आशिष नरळे याने १५०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तर अमर माने याने १५०० मीटरमध्ये आणि तेजस सोनवणे याने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली.
रिले शर्यतीतही सिद्धनाथचा दबदबा
वैयक्तिक प्रकारांबरोबरच रिले शर्यतीतही सिद्धनाथच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय दाखवला. ४×१०० मीटर रिलेमध्ये अनिश सरतापे, आशिष नरळे, महेश खांडेकर, संग्राम खांडेकर व विशाल नरळे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
तर ४×४०० मीटर रिलेमध्ये धीरज झिमल, अमर माने, तेजस सोनवणे, संतोष विरकर व संग्राम खांडेकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय स्पर्धेकडे आता नजरा
तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे सिद्धनाथ हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरावर जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत हे खेळाडू माण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच म्हसवड परिसरातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

