बोलेरोत कोंबली जनावरे, दुचाकींवर संशयित मांस; बार्शी पोलिसांचा मोठा पर्दाफाश!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी :प्रतिनिधी
जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्यांसह संशयित गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत तब्बल ६ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत चार जनावरे, अंदाजे ५५ किलो संशयित गोमांस, एक बोलेरो पिकअप आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या कारवाईत संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून तिघांना पकडले.

कुसळंब चौकात जनावरांची निर्दयी वाहतूक उघड

पहिली कारवाई १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुसळंब रोडवरील कुसळंब चौकात करण्यात आली. महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-12-SX-3813) मधून जनावरांची क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहनाची तपासणी केली असता दोन जर्सी गायी, एक देशी गाय आणि एक देशी खोंड अशी चार जनावरे अत्यंत अरुंद जागेत कोंबून ठेवल्याचे आढळले. जनावरांना चारा, पाणी तसेच आवश्यक सुविधाही उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी चारही जनावरे आणि बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी राजू तानाजी थोरात (रा. बाभूळगाव), राजू मुनाफ सौदागर आणि कपिल कलीम सौदागर (दोघे रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धसपिंपळगावात दीड किलोमीटर पाठलाग; तिघे पोलिसांच्या ताब्यात

दुसरी कारवाई १७ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूम रोडवरील धसपिंपळगाव हद्दीत करण्यात आली. दोन मोटारसायकलींवरून तीन इसम संशयित गोमांस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संबंधितांनी मोटारसायकली वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हार न मानता सुमारे १.५ किलोमीटर पाठलाग करून तिन्ही इसमांना पकडले.

मारुफ महंमद सौदागर (वय २३), उजेफ महंमद सौदागर (वय २२) आणि नुरेन इरफान सौदागर (वय २३, तिघे रा. मंगळवार पेठ, बार्शी) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

त्यांच्याकडील दोन मोटारसायकलींची तपासणी केली असता अंदाजे ३० किलो आणि २५ किलो असे एकूण ५५ किलो संशयित मांस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मांसासह दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या. मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीसाठी घेण्यात आले असून अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

या प्रकरणात महमदनूर कुरेशी आणि इब्बू कुरेशी यांचीही नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोन कारवायांत ६ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण चार जनावरे, बोलेरो पिकअप, अंदाजे ५५ किलो संशयित मांस आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पहिल्या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत, तर दुसऱ्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची कामगिरी

या दोन्ही कारवाया सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि PSI आबासाहेब शिरगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या मोहिमेत राजेंद्र मंगरुळे, अमृत खेडकर, युवराज गायकवाड, हनुमंत काळेळ, श्रीमंत खराडे, महेश माने, अमृता गुंड आणि प्रदीप जगताप या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून करण्यात आलेल्या या कारवायांमुळे अवैध वाहतुकीविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी कडक संदेश दिला आहे. विशेषतः दीड किलोमीटर पाठलाग करून संशयितांना पकडल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *