धनगरवाडी यात्रेत धक्का लागण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी :प्रतिनिधी
धनगरवाडी (ता. बार्शी) येथे यात्रेदरम्यान धक्का लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाला पाच जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यश पांडुरंग बर्डे (वय २१, रा. नागोबाची वाडी, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, यश बर्डे हे आपला मित्र युवराज याच्यासोबत धनगरवाडी येथील यात्रेसाठी गेले होते. यावेळी गावातील धनु वसंत जाधव, परसू वसंत जाधव, अभिषेक धनु जाधव, गणेश परशुराम जाधव आणि सागर येडबा जाधव (सर्व रा. नागोबाची वाडी) यांनी धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.
या वादातून संबंधित पाच जणांनी हाताने, काठीने तसेच दगडाने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(३), १९० व १९१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार दळवी यांनी केली असून, पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डूकळे करीत आहेत.

