खांडवीत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ४० हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी :प्रतिनिधी
खांडवी, ता. बार्शी येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी खांडवी येथील पानटपरी चालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विविध कंपन्यांच्या पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा एकूण ४० हजार ९६४ रुपये ५० पैसे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय प्रभू गव्हाणे (वय ३७, रा. खांडवी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या मालकीच्या शिवसाक्षी पानटपरीवर १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बसस्थानकाजवळ असलेल्या या पानटपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि विविध प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचा विक्रीसाठी साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, आरएमडी पानमसाला, तसेच विविध प्रकारच्या चघळण्याच्या तंबाखूचा समावेश आहे. हा साठा विक्रीच्या उद्देशाने ठेवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर कार्यालयातील सहायक आयुक्त कार्यालयाशी संबंधित अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, २७४, २७५ व १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे हे तपास करत असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीविरोधात प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *