अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुका पोलिसांची कारवाई; गुटखा आणि दारूसाठा जप्त!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी | प्रतिनिधी

बार्शी तालुका पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत एकूण २० हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आगळगाव येथून १७ हजार ७३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला, तर धसपिंपळगाव येथे अवैध दारू बाळगल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

आगळगावात गुटख्याचा साठा जप्त

११ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरमध्ये पोलिसांनी कारवाई केली. यावेळी केआर १०००, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको असा एकूण १७ हजार ७३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धसपिंपळगावात अवैध दारूवर कारवाई

धसपिंपळगाव येथे एकाच दिवशी अवैध दारू बाळगल्याप्रकरणी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. सायंकाळी ५.४० वाजता जिवलग हॉटेलच्या पाठीमागील परिसरात चंद्रकांत बलभीम पिंगळे (वय ५८) याच्याकडून देशी दारूच्या ११ बाटल्या, असा ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता गावाबाहेरील नदीशेजारी मुन्ना भालेकर यांच्या पत्राशेडमागे संतोष अर्जुन धस (वय ५१) याच्याकडून देशी दारूच्या १२ बाटल्या आणि रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या तीन बाटल्या, असा १ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्यासह पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, अमृत खेडकर, गणेश दळवी, अमृता गुंड, प्रदीप चौधरी, महेश माने, ओमप्रकाश दासरे, रोहित बागल आणि अश्विनी साबळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *