सातारा तालुका सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रवीण शिंदे
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
सातारा प्रतिनिधी
सैनिक फेडरेशनच्या सातारा तालुका पुनर्गठन बैठकीत माजी सैनिक प्रवीण शिंदे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सैनिक फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोबर रोजी सातारा येथे ही बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी नि. कॅप्टन संतोष धुमाळ, तालुका कार्याध्यक्षपदी रवींद्र शेळके, तालुका कार्यकारिणी सदस्यपदी अनिल राऊत तसेच खटाव तालुका कार्यकारिणी सदस्यपदी दादासो देशमुख यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन प्रशांत कदम यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशांत कदम यांनी माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीय तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पोलिस, महसूल व अन्य शासकीय विभागांतील समस्या, सैनिक कल्याण विभागाच्या विविध योजना तसेच नालसा वीर परिवार सहाय्यता योजनेबाबत जनजागृती करून त्याचा लाभ संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सातारा तालुक्यातील अधिकाधिक माजी सैनिकांना संघटनेशी जोडून सैनिक फेडरेशन मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शासन व प्रशासनाच्या माध्यमातून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही कदम यांनी दिली.
दरम्यान, सातारा दौऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
बैठकीस खटाव तालुका अध्यक्ष रामचंद्र इंगळे, कराड तालुका उपाध्यक्ष हणमंत मडकई, सेवारत सैनिक हवालदार गोविंद शेजवळ यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.

