म्हसवडकरांना गाळे वाटपात प्राधान्य द्या;किशोर सोनवणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी :
म्हसवड नगरपरिषदेच्या समोरील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या प्रस्तावित लिलाव प्रक्रियेत स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी म्हसवड सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
म्हसवड हे कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाते. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे येथील अनेक युवक व महिला उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे स्थलांतर करण्यास भाग पडतात. अशा परिस्थितीत नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचा लाभ स्थानिक बेरोजगार युवक, लघुउद्योजक आणि गरजू कुटुंबांना मिळणे आवश्यक असल्याचे किशोर सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेक ठिकाणी बाहेरगावातील व्यक्तींनी गाळे मिळवून ते अधिक भाड्याने पोटभाडेकरूंना दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय करू इच्छिणाऱ्या स्थानिकांना संधी मिळत नाही. शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थानिक रहिवाशांना प्रथम प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत सोनवणे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.
म्हसवड नगरपरिषदेने गाळे वाटप करताना गावातील कायमस्वरूपी रहिवासी, बेरोजगार युवक, महिला बचत गट, नवउद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विशेष विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. अल्प अनामत रक्कम व सुलभ अटींवर गाळे उपलब्ध झाल्यास अनेक कुटुंबांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून म्हसवड नगरपरिषदेला योग्य त्या सूचना द्याव्यात व स्थानिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीला शहरातील विविध सामाजिक, व्यावसायिक व नागरिक घटकांचा पाठिंबा मिळत असून आगामी गाळे लिलाव प्रक्रियेकडे संपूर्ण म्हसवडकरांचे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर किशोर सोनवणे यांच्यासह तेजसिंह राजेमाने, संजय विरकर, चंद्रकांत केवटे, परेश कुमार व्होरा, सचिन लोखंडे, कांता ढाले, संजय पाटील, पप्पू शिंदे, सचिन सोनवणे आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

