वराडे वन्यजीव उपचार केंद्राला पूर्णवेळ डॉक्टर द्या; रोहन भाटे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी
वराडे (ता. कराड) येथील वन्यजीव उपचार केंद्रासाठी (TTC) पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वतंत्र पद निर्माण करून तातडीने भरती करावी. तसेच केंद्राच्या सक्षम आणि नियमित कामकाजासाठी स्वतंत्र वार्षिक निधी उपलब्ध करून हे केंद्र पश्चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक वन्यजीव उपचार केंद्र म्हणून विकसित करावे, अशी मागणी सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (शहा) यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.

याबाबत भाटे यांनी वनमंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठविले आहे. वराडे येथे वन्यजीव उपचार केंद्र स्थापन करून कार्यान्वित केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करतानाच, अत्याधुनिक इमारत आणि सुविधा असूनही पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास केंद्राचा मूळ उद्देश अपूर्ण राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

कराड हे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांशी उत्तम रस्ते संपर्क आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सागरेश्वर, राधानगरी आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्य परिसरातील जखमी, आजारी तसेच अपघातग्रस्त वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी वराडे येथील केंद्र अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.

जखमी वन्यजीवांच्या उपचारामध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास उपचाराला होणारा विलंब वन्यजीवांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या केंद्रासाठी पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वतंत्र पद निर्माण करून ते तातडीने भरावे, अशी ठाम मागणी भाटे यांनी केली आहे.

केंद्राच्या दैनंदिन कामकाजासाठी औषधे, शस्त्रक्रिया साहित्य, निदान उपकरणे, बचाव व पुनर्वसन साहित्य, आवश्यक मनुष्यबळ आणि वाहन व्यवस्थेसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी वार्षिक निधीची तरतूद करावी. केवळ इमारत उभारून केंद्र सुरू करणे पुरेसे नसून ते सातत्याने सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वन्यजीव बचावाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वराडे येथील केंद्राचा नागपूरच्या वन्यजीव उपचार केंद्राच्या धर्तीवर विकास करून अत्याधुनिक उपचार सुविधा, प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळ, स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारी आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. या केंद्राला पश्चिम महाराष्ट्रातील प्रादेशिक रेफरल वन्यजीव उपचार केंद्राचा दर्जा देण्याची क्षमताही असल्याचे भाटे यांनी नमूद केले आहे.

या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय झाल्यास सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी तसेच संपूर्ण सह्याद्री परिसरातील हजारो वन्यजीवांना वेळेत उपचार मिळू शकतील आणि राज्य शासनाच्या वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळेल, असा विश्वास रोहन भाटे यांनी व्यक्त केला आहे.

या निवेदनाची प्रत संबंधित लोकप्रतिनिधींसह महसूल व वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *