पत्नीच्या खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल! दारूच्या नशेत डायल ११२ वर कॉल; दहिवडी पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी (प्रतिनिधी) :
पत्नीचा खून केल्याची खोटी माहिती डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर देणाऱ्या आंधळी येथील ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत हा खोटा कॉल केल्याचे पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.२७ वाजण्याच्या सुमारास दहिवडी पोलीस ठाण्याच्या डायल ११२ हेल्पलाईनवर मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या सुभेदार भिमराव शेंडे (वय ५०, रा. नायरा पेट्रोल पंपाजवळ, आंधळी, ता. माण, जि. सातारा) याने आंधळी येथील नायरा पेट्रोल पंपावर आपल्या पत्नीचा खून केल्याचे सांगत पोलिसांची मदत आणि रुग्णवाहिका पाठविण्याची मागणी केली.
कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने तातडीने शासकीय वाहनातून घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा खून झालेला नसल्याचे आणि ती घटनास्थळी उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी कॉलबाबत चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने दारूच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे समोर आले. तसेच, पोलिसांनी श्वासातील अल्कोहोल तपासणी उपकरणाच्या साहाय्याने तपासणी केली असता संबंधित व्यक्तीने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सुभेदार भिमराव शेंडे याच्याविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस फौजदार नंदकुमार खाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुहास गाडे, अजय भोसले आणि गणेश खाडे यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार नीलम रासकर करीत आहेत.
डायल ११२ सेवेचा गैरवापर टाळा!
डायल ११२ ही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळवून देणारी महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे या क्रमांकावर खोटी माहिती देऊन कॉल केल्यास पोलीस यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ विनाकारण खर्च होऊ शकते. नागरिकांनी या सेवेचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

