महावितरणच्या निष्काळजीपणामुळे आजी-नातवाचा मृत्यू?; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ६ जुलैला महावितरण कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘तेरावा’ आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि. २९ (प्रतिनिधी) :
मार्डी (ता. माण) येथे विजेचा धक्का लागून सुमन विलास काळे (वय ६०) व त्यांचा १३ वर्षीय नातू सुजित युवराज काळे यांचा झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून महावितरणच्या कथित निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा ६ जुलै रोजी सातारा येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर दिवंगत आजी-नातवाचा प्रतीकात्मक ‘तेरावा’ घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा मंडळ यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
करचे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित वीजवाहिनी जवळपास महिनाभर तुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडून होती. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नाही. या दाव्यांची चौकशीत पुष्टी झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत, पात्र वारसाला महावितरणमध्ये नोकरी तसेच माण-खटाव तालुक्यातील सर्व वीजवाहिन्यांचे विशेष सुरक्षा ऑडिट करून धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“दोन निष्पाप जीव गमावल्यानंतरही दोषींवर कारवाई झाली नाही, तर ६ जुलै रोजी पीडित कुटुंबीयांसह संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील,” असे महेश करचे यांनी स्पष्ट केले.

