विक्रम शिंगाडेंवरील गुन्ह्याचे राजकारण करू नये : अर्जुन काळे. वैयक्तिक प्रकरणाला सामाजिक रंग देऊन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न टाळावा
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे राजकारण करू नये, अशी भूमिका माण पंचायत समितीचे सदस्य अर्जुन काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. या घटनेचा राजकीय फायदा घेऊन शिंगाडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

म्हसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेस धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष प्रशांत गोरड,डॉ. प्रमोद गावडे,आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, डॉ. वसंत मासाळ, डॉ. अजित दडस, मार्केट कमिटीचे सभापती ब्रह्मदेव पुकळे, सदाशिव बनगर, नगराध्यक्ष सचिन विरकर, नगरसेवक विजय बनगर, दीपक बनगर, सतीश मासाळ यांच्यासह कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील नागरिक उपस्थित होते.
अर्जुन काळे म्हणाले, “या प्रकरणात मंत्र्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला जात आहे; मात्र या प्रकरणाशी मंत्र्यांचा कोणताही संबंध नाही. पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
दरम्यान, तालुकाध्यक्ष प्रशांत गोरड यांनीही या प्रकरणाला जातीय किंवा सामाजिक वळण देणे योग्य नसल्याचे सांगितले. वरकुटे मलवडीतील घटना ही मूळतः वैयक्तिक स्वरूपाची असून, तिचा फायदा घेऊन मुस्लिम-धनगर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंगाडे यांच्याकडून काही बाबी चुकीच्या घडल्याचे मान्य करतानाच, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. एफआयआरमधील तथ्यांची योग्य पडताळणी करून दोषी कोण, हे कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट व्हावे, अशी मागणीही करण्यात आली.
“समाजाच्या नावावर राजकारण करून वातावरण बिघडवू नये. कोणावरही अन्याय होऊ नये आणि सत्य परिस्थिती समोर यावी,” अशी भूमिका पत्रकार परिषदेत उपस्थितांनी व्यक्त केली.

