पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी दहिवडी पोलिसांच्या जाळ्यात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी प्रतिनिधी :

दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या शिशुपाल कृषा जाधव (वय २४, रा. पाचवड, ता. माण, जि. सातारा) याला दहिवडी पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी फलटण तालुक्यातील बरड येथून ताब्यात घेतले. त्याला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी रात्री शिंगणापूर येथील शंभू विद्यालयाजवळ शुभंकर शरद बगाडे (वय २५, रा. सरडे, ता. फलटण) यांना सहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच, २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री पाचवड येथील जोतिबा मंदिराजवळ नामदेव विठ्ठल जगदाळे यांच्या मुलांना नऊ ते दहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करत हातातील कड्याने व कोयत्यासारख्या हत्याराने मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही प्रकरणांतील तपासादरम्यान निष्पन्न झालेला आरोपी शिशुपाल जाधव हा गुन्हे दाखल झाल्यापासून फरार होता. तो आपले अस्तित्व लपवून मोबाईल बंद ठेवत असल्याने पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दहिवडी पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. आरोपी बरड, ता. फलटण येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, अजिनाथ नरबट आणि महेंद्र खाडे यांनी केली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *