गणेशनगर (कोर्टी) येथे कातकरी समाजासाठी जनजागृती अभियान; अल्पवयीन विवाह रोखण्याचा युवकांचा निर्धार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

उंब्रज प्रतिनिधी / कुलदीप मोहिते

गणेशनगर (कोर्टी) येथे कातकरी समाजातील नागरिकांसाठी कोर्टी ग्रामपंचायत, उंब्रज पोलीस ठाणे, रोटरी क्लब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात महिला, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह, कमी वयातील गर्भधारणा आणि त्यातून आई व बाळाच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. अल्पवयीन विवाहाचे सामाजिक व कायदेशीर दुष्परिणाम समजावून सांगत समाजाने अशा प्रथांना कायमचा आळा घालावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रजच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया खंडागळे यांनी महिलांशी संवाद साधत सुरक्षित मातृत्व, गर्भधारणेची वेळेवर नोंदणी, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ आणि अल्पवयीन गर्भधारणेमुळे उद्भवणारे धोके याबाबत सविस्तर माहिती दिली.

रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जागृतीचे महत्त्व अधोरेखित करत मुला-मुलींना शिक्षणाची समान संधी देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे कातकरी समाजातील युवक-युवतींनी यापुढे आपल्या समाजात अल्पवयीन विवाह होऊ देणार नाही, तसेच अशा चुकीच्या प्रथांना विरोध करण्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना दिली.

या उपक्रमामुळे कातकरी समाजात आरोग्य, शिक्षण आणि कायद्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, समाजहितासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास ग्रामसेवक ज्योतीराम ढणे, आरोग्य निरीक्षक विकास गरुड, शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल यादव, विवेकानंद जोशी, विनायक जाधव, कमलाकर पाटील, प्रवीण यादव, मी वाघमारे, उर्मिला निकाळजे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *