मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धिंगाणा; डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण, ऑक्सिजन मशीनची तोडफोड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी प्रतिनिधी :

माण तालुक्यातील मलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या तिघांनी डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अपघातात जखमी झाल्याचे सांगत काही युवक उपचारासाठी मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. डॉक्टर अभिजीत यादव यांच्या सूचनेनुसार नर्स स्वाती भुजबळ व शिपाई वैभव जंगम हे जखमींवर उपचार करत असताना आरोपींनी घाईघाईने उपचार करण्याची मागणी करत वाद घातला.

यावेळी ओंकार सोनमळे याने शिपाई वैभव जंगम यांना कानशिलात लगावून डोके व मानेवर मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नर्स स्वाती भुजबळ यांचाही हात पिरगळून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच डॉक्टर अभिजीत यादव यांनाही कानशिलात मारून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याचवेळी आरोपींनी रुग्णालयातील ऑक्सिजन मशीनला लाथा मारून त्याचे नुकसान केले. त्यामुळे काही काळ आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.

या प्रकरणी वैभव सिद्धेश्वर जंगम (वय 37, रा. मलवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार सोनमळे, रोहन शिंदे (दोघे रा. लिंब, ता. सातारा) व योगेश जाधव (रा. नवलेवाडी, ता. मान) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 115(2), 352, 351(2), 324(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दहिवडी पोलिसांनी दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *