म्हसवड पोलिसांचा डॉल्बी-डीजेवर कडक इशारा; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई रात्री १० नंतर साऊंड सिस्टीम वाजविल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

नागरिकांच्या शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच ध्वनीप्रदूषण वाढविणाऱ्या डॉल्बी आणि डीजे सिस्टीमविरोधात म्हसवड पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली आज म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील डॉल्बी व डीजे सिस्टीम मालकांची विशेष बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा खासगी कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन करून डॉल्बी किंवा डीजे सिस्टीमचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची ठरवून दिलेली डेसीबल मर्यादा ओलांडल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.

तसेच कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधितांनी पोलीस ठाण्याची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. विशेष म्हणजे रात्री १० नंतर साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

सध्या गावागावांत वाढणारे डॉल्बीचे प्रमाण, कानठळ्या बसवणारा आवाज आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता म्हसवड पोलिसांनी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, नियम मोडणाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. आगामी काळातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत म्हसवड पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

चौकट:
कोणत्याही दबावाला बळी न पडता पोमन साहेब या नियमांची काटेकोरपने अंमलबजावणी करतील अशी म्हसवडकरांना आशा आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *