अहिंसा पतसंस्थेत सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोंबे यांचा गौरव सभापती विजयशेठ बनगर यांच्या हस्ते सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी :
अहिंसा पतसंस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोंबे यांचा शाल, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. म्हसवड नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा आरोग्य व स्वच्छता सभापती विजयशेठ बनगर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरसेवकपदी निवड होऊन सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल विजयशेठ बनगर यांचा संस्थेचे कुटुंबप्रमुख व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांच्या हस्ते शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर समाजातील विधवा, निराधार महिला, अपंग व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोंबे यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले, “राजाभाऊ डोंबे यांनी निराधार व पीडित घटकांसाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. अन्यायाविरुद्ध मोर्चे, आंदोलने करत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रात कुठेही मदतीची हाक आली तरी धावून जाणारे हे निःस्वार्थ व्यक्तिमत्त्व आहे.” तसेच विजयशेठ बनगर हेही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी आपल्या मनोगतात म्हणाले, “राजाभाऊ डोंबे हे समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणारे खरे समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचाही पर्दाफाश करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.”
ते पुढे म्हणाले, “विजयशेठ बनगर यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी समाजकार्याचा ठसा अधिक प्रभावीपणे उमटवावा,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ डोंबे म्हणाले, “सामाजिक कार्य करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अन्याय सहन होत नसल्यामुळे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम लढत राहिलो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देताना संघर्ष करावा लागला, मात्र लोकांचे प्रेम व आशीर्वाद यामुळेच आजही कार्यरत आहे.”

या कार्यक्रमास लहुराज चव्हाण, जीवन डोंबे, विशाल शिंदे, संस्थेचे संचालक बाळू सरतापे, धवल व्होरा, कर्मचारी, अधिकारी तसेच म्हसवड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले, तर आभार नाना मासाळ यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *