मसूर-बनवडी फाटा रस्त्यावरील खड्डे ३० ऑक्टोबरपर्यंत बुजवा; अन्यथा १ नोव्हेंबरला रास्ता रोको!
संजय भोसले यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; खड्ड्यांत झाडे लावून आंदोलन करणार
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते :प्रतिनिधी
मसूर :
राज्यमार्ग क्रमांक १४२ वरील मसूर ते बनवडी फाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या रस्त्यावरील खड्डे ३० ऑक्टोबरपर्यंत बुजविण्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास १ नोव्हेंबर रोजी मसूर एसटी स्टँडसमोरील खड्ड्यांत झाडे लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांनी दिला आहे.
यासंदर्भात भोसले यांनी २५ ऑक्टोबर रोजी मसूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मसूर ते बनवडी फाटा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. खड्डे चुकविताना चारचाकी वाहने, अवजड वाहने आणि एसटी बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक बनला असून, गेल्या आठ दिवसांत तीन ते चार दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे पडल्याचे भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्यातच ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खड्ड्यांचा आकार वाढत असून, संभाव्य अपघातांचा धोका अधिक गंभीर बनला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आकाश हुद्दार आणि साईट इन्चार्ज कोकरे यांना गेल्या महिनाभरापासून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विविध वृत्तपत्रांतूनही या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तरीदेखील संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार राहतील, असा इशारा देत, अशा दुर्घटनेच्या परिस्थितीत संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३० ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न झाल्यास १ नोव्हेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि वाहनचालकांच्या वतीने मसूर एसटी स्टँडसमोरील खड्ड्यांत झाडे लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांची राहील, असे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या इशाऱ्याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने पावले उचलणार का, याकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

