म्हसवड तहसील कार्यालया साठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करा…. कृषिरत्न विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे वेळेत होत नाहीत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो . सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी व त्यांची कामे वेळेत होण्यासाठी म्हसवड अप्पर तहसील कार्यालयातील रिक्त जागी कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी माननीय संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांना नुकतेच दिले. अनेक तपाच्या मागणीनंतर जनतेच्या हितासाठी म्हसवड येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर होऊन कार्यान्वितही झाले. मात्र सध्या या कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कशात काय आणि फाटक्यात पाय अशी अवस्था जनतेची झालेली आहे.                  म्हसवड येथे तहसील कार्यालय मंजूर झाले, लोकांची दहिवडी ला जाण्याची पायपीट थांबली. मात्र पुरेशा अधिकारी, व कर्मचाऱ्या अभावी जनतेची कामे वेळेत होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. किरकोळ कामासाठी जनतेला हेलपाटे घालावे लागत आहे.
कायम कर्मचारी नसल्याने अनेक टेबलच्या जागा रिक्त दिसत आहेत. माण तालुक्यातील निम्म्या गावांचा समावेश म्हसवड तहसील मध्ये केला. वास्तविक पाहता दहिवडीपेक्षा कामाचा लोड म्हसवड तहसील ला अधिक आहे. तहसीलदार म्हणून नियुक्त असणाऱ्या मीना बाबर निंबाळकर यांना विविध मिटींग, निवडणूक, न्यायालयीन व अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी सातारा, दहिवडी व इतर ठिकाणी तातडीने जावे लागते यावेळी सामान्य नागरिकाची किरकोळ कामे ठप्प होतात.

    म्हसवड तहसील कार्यालय सुरू होऊन दोन वर्षे झाली मात्र या ठिकाणचे नायब तहसीलदार एक पद , अव्वल कारकून एक पद,तसेच लिपिक दोन पदे अद्याप रिक्त आहेत. एकंदरीत मंजूर पदाच्या निम्मीही पदे भरलेली नाहीत. या कार्यालयासाठी अधिकृत शासकीय गाडी नाही, उपलब्ध तकलादु जुन्या गाडीला शासकीय अधिकृत चालकाची उपलब्धता नाही. कार्यालय साफसफाई करण्यासाठी साधा शिपाई सुद्धा अधिकृतरित्या उपलब्ध नाही. सर्वकाही उसनवार व अलबेल स्वरूपातील यंत्रणा असल्याने तहसील कार्यालय मंजूर होऊन सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत होत नसल्याने त्याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे,तसेच नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

        एकूणच म्हसवड येथे तहसील कार्यालय मंजूर करण्याचा हेतू सफल होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या निदर्शनास आणून दिले. जनहिताचा विचार करून म्हसवड अप्पर तहसील कार्यालयातील रिक्त जागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्त करावी अशी मागणी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *