कै. भरत कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ मोतीबिंदू रुग्णांचे निदान
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी )
येणके, ता. कराड येथे कै. भरत रघुनाथ कदम (सर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरात २५ मोतीबिंदूग्रस्त रुग्ण आढळून आले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती आप्पासाहेब गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. एस. के. पाटील, उपाध्यक्ष दादासो गरुड, माजी सोसायटी चेअरमन धनंजय पाटील, ग्रामपंचायत सचिव आनंदराव गरुड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिनकरराव गरुड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पाटील, जगन्नाथ तानाजी गरुड, जगन्नाथ शंकर कदम, माजी उपसरपंच राहुल गरुड, अनंत गरुड, राहुल अशोक गरुड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनंतराव गरुड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दादासो कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कै. भरत कदम यांच्या स्मृती जपण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कार नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने डॉ. राहुल फासे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची नेत्रतपासणी केली. तपासणीदरम्यान २५ मोतीबिंदूग्रस्त रुग्णांचे निदान झाले. संबंधित रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरास माजी नगरसेवक फारुक पटवेकर तसेच कराड-मलकापूरचे नगराध्यक्ष मनोहर भास्कर शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा आरोग्यविषयक उपक्रमांची गरज असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलेल्या या शिबिरामुळे अनेकांना नेत्रविकारांचे वेळेत निदान होण्यास मदत झाली. कै. भरत रघुनाथ कदम (सर) यांच्या स्मृतीस अभिवादन करणारा हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

