म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्या भव्य मोफत आरोग्य शिबिर
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
“माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड यांच्या वतीने बुधवार, दि. 10 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 12.30 या वेळेत मोफत सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, ओरल कॅन्सर तपासणी, क्षयरोग (TB) स्क्रिनिंग, नेत्र तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी तसेच महिला आरोग्य तपासणी अशा विविध आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय, आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी तसेच त्यासंदर्भातील मार्गदर्शनही शिबिरात केले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि विविध आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरास येताना नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणावे, असेही कळविण्यात आले आहे.

