हिंगणी येथील घरफोडीचा गुन्हा म्हसवड पोलिसांनी काही तासांत उघडकीस आणला; आरोपीस अटक, संपूर्ण मुद्देमाल जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

माण तालुक्यातील हिंगणी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत म्हसवड पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून म्हसवड पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी येथील रहिवासी ताई उत्तम खांडेकर (वय ५५) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिनांक २ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील पर्समध्ये ठेवलेले चांदीचे कडे, चांदीचा छल्ला, चांदीच्या मासुळ्या तसेच सोन्याचा बदाम असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३)(४), ३०५(अ) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच सपो नि संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय खबर आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान सागर नवनाथ खांडेकर (रा. हिंगणी, ता. माण) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण ३० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एम. एन. हांगे यांनी केला. तर पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला. या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून म्हसवड पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *