शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध शुल्क आकारू नये; शिक्षण उपसंचालकांचे स्पष्ट निर्देश
व्हिजन २४ तास न्यूज
पुणे, प्रतिनिधी :
शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आणि गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची अवैध रक्कम वसूल केल्यास संबंधित शाळा व महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी दिले आहेत.
संचालनालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ५ जून २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात विभागीय उपसंचालक आणि सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः इंदापूर तालुक्यात काही शाळांकडून शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देण्यासाठी प्रति विद्यार्थी २०० रुपये बेकायदेशीरपणे आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.
सध्या इयत्ता १० वी, ११ वी आणि १२ वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याकडून टीसी किंवा मार्कलिस्ट देण्यासाठी शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात पूर्वीच्या शासन निर्णयानुसार सर्व संबंधित अधिकारी व संस्थांना सूचना देऊन नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून अवैध रक्कम घेतली असेल, त्यांच्यावर कारवाई करून संबंधित विद्यार्थ्यांना ती रक्कम परत देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल शिक्षण संचालनालयास आणि तक्रारदारांना ई-मेलद्वारे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार असून शैक्षणिक कागदपत्रांच्या नावाखाली होणाऱ्या अवैध वसुलीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

