गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊटपदी निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

गोंदवले खुर्द : प्रतिनिधी — सादिक शेख

माण तालुक्याचे गुणवंत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण महादेव पिसे यांची सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या कार्यकारी समितीवर सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट म्हणून निवड झाली आहे. तसेच दहिवडी येथील प. म. शिंदे कन्या विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका संगीता काटकर यांची सहाय्यक जिल्हा आयुक्त गाईडपदी निवड झाली आहे. या दोन्ही निवडीमुळे माण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, शिक्षक व शिक्षणप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, दहिवडी येथे स्काऊट-गाईड माहिती व नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मण पिसे यांचा नव्या पदावरील निवडीबद्दल विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

जागतिक युवक दिनाचे औचित्य साधून दहिवडी कन्या शाळेत विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी पिसे यांनी ‘युवक कसा असावा’ या विषयावर गाईड पथकातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. युवकांनी शिस्त, देशसेवा आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ततेची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला सातारा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक बाळासाहेब राठोड (स्काऊट), सविता भोळे (गाईड), लिडर ट्रेनर प्रताप माने, रंजना शिंदे, रेखा पवार, वरिष्ठ लिपिक सुनील खाडे, शाळेचे पर्यवेक्षक हंबीरे सर, गाईड पथकाच्या प्रमुख मडके मॅडम, स्मिता कांगणे यांच्यासह तालुक्यातील स्काऊट शिक्षक उपस्थित होते.

लक्ष्मण पिसे आणि संगीता काटकर यांच्या निवडीमुळे माण तालुक्यातील स्काऊट-गाईड चळवळीला निश्चितच नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *