दहिवडीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी :प्रतिनिधी 

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी (१३ ऑगस्ट) दहिवडी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. API विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत दहिवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दुपारी १२.१५ वाजता सुरू झालेली रॅली आंबेडकर चौक, बाजार पटांगण, मायणी चौक, फलटण चौक मार्गे एस.टी. स्टँड, दहिवडी येथे पोहोचली. सुमारे पन्नास मिनिटे चाललेल्या या रॅलीदरम्यान विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. रॅलीमुळे दहिवडी शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.

रॅलीनंतर महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दहिवडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी API विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज, पोलिसांची कर्तव्ये आणि विविध विभागांची कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यातील शस्त्रांची माहिती देऊन त्यांचा वापर आणि पोलिसांच्या कामातील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचा परिसर दाखविण्यात आला. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करावी आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करावी, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. API विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशन आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *