तब्बल १५ वर्षांनी हरवलेला रोहन सुखरूप घरी; वडील-नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज प्रतिनिधी :
आईच्या निधनानंतर आलेल्या तणावातून वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी घरातून निघून गेलेला रोहन कृष्ण थोरात तब्बल १५ वर्षांनी सुखरूपपणे घरी परतला. त्यामुळे वडील आणि नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. उंब्रज पोलिसांच्या सहकार्याबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
कराड तालुक्यातील कोटी येथील रोहन कृष्ण थोरात हा दिनांक १३ जानेवारी २०११ रोजी आईच्या निधनानंतर तणावाच्या परिस्थितीत घरातून निघून गेला होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी उंब्रज पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक ०३/२०११ अन्वये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांसह नातेवाईकांकडून रोहनचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
दरम्यान, १० ऑगस्ट २०२६ रोजी रोहन अचानक घरी परतला. नातेवाईकांनी त्याला उंब्रज पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याची आवश्यक ती चौकशी केल्यानंतर तोच २०११ मध्ये बेपत्ता झालेला रोहन कृष्ण थोरात असल्याचे निष्पन्न झाले.
तब्बल १५ वर्षांनंतर मुलगा सुखरूप परतल्याने रोहनचे वडील व नातेवाईक भावुक झाले. दीर्घकाळानंतर आपल्या मुलाला डोळ्यांसमोर पाहताना त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी कुटुंबीयांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे आभार मानले.
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा; मा. डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा; तसेच मा. राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

