शिंगणापूर येथे बेवारस मानवी कवटी आढळली; पोलिस तपास सुरू

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड/दहिवडी (प्रतिनिधी) –

माण तालुक्यातील शिंगणापूर गावाच्या हद्दीत एक बेवारस मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास (अचूक वेळ अज्ञात) शिंगणापूर येथील बळीप वस्ती परिसरात, जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे एक मानवी कवटी बेवारस अवस्थेत आढळून आली. सदर कवटीला त्वचा, केस तसेच डोळे, कान, नाक यांसारखे अवयव नसून जवळ काळ्या रंगाचे केस पडलेले असल्याचे प्राथमिक वर्णन आहे.

या घटनेची माहिती मिळताच संतोष शिवाजी बोराटे (वय 34, पोलीस पाटील, रा. शिंगणापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक 20/2026 दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा (इनक्वेस्ट) केला असून संबंधित कवटीचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर मानवी अवशेषांची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे कारणही अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे या करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *